ठाण्यामध्ये सोमवारी दुपारी खारकर आळीतील एका औषधांच्या दुकानात कोल्हा शिरला. घाबरलेल्या नागरिकांनी वन विभागाशी संपर्क साधला. अखेर वन कर्मचारी आणि प्राणीमित्र संस्थांचे कार्यकर्ते यांनी घटनास्थळी धाव घेत या कोल्ह्याला पकडले. जखमी अवस्थेत असलेल्या या कोल्ह्याची रवानगी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात करण्यात आली आहे.
वाइल्ड लाइफ, वेल्फेअर असोसिएट या प्राणी संस्थेचे कार्यकर्ते आणि वनक्षेत्रपाल नरेंद्र मुठे, वनपाल संजय पवार, संदीप मोरे, दत्तात्रेय पवार यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन मोठ्या शिताफीने त्याला पकडले. त्याच्या पायाला जखम झाली आहे. त्याला पुढील उपचारांसाठी बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये नेण्यात आले आहे. हे कोल्हे मुंबई, ठाणे, वसई, उरण परिसरातील खाडीजवळ आढळतात. या कोल्ह्यांची उंची साधारण दोन ते अडीच फूट असून लांबी तीन ते साडेतीन फूट असते.

