सिंधुदुर्गातील (Sindhudurg) बहुप्रतिक्षित चिपी विमानतळाच्या (Chipi Airport) उदघाटन सोहळ्याचे बिगुल अखेर वाजले आहे. राज्य शासनाकडून या उदघाटन सोहळ्याची कार्यक्रम पत्रिका निश्चित झाली असून शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी २३ जानेवारीला सकाळी १० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या विमानतळाचे उदघाटन होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांच्यासह मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत.
चिपी विमानतळ मी बांधला आहे, तो बांधून पूर्ण झाला आहे. त्यामुळे त्याठिकाणी विमान उतरवणे आणि उड्डाण करण्याची जबाबदारी मी घेईन, लवकरात लवकर ते सुरू होण्यासाठी मी संबधित मंत्र्यांची भेट घेईन, असा दावा खासदार नारायण राणे यांनी केला होता. यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांना जिल्ह्याबाबत आस्था नाही. जिल्ह्य़ाला विकासात मागे टाकण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे, असा थेट आरोपही राणे यांनी यावेळी केला होता.
चिपी विमानतळावर पहिली हवाई चाचणी १२ सप्टेंबर २०१८ रोजी यशस्वीपणे पार पडली. गणेशाची मूर्ती घेऊन विमान सिंधुदुर्गातल्या चिपी विमानतळावर उतरले होते. चेन्नईहून एचडीएल कंपनीच्या खासगी विमानाने उड्डाण केले आणि गोवा मार्गे विमान सिंधुदुर्गात दाखल झाल होते. पहिल्या विमानाने विमानतळावर लॅन्डिंग केल्यावर सिंधुदुर्गवासियांनी टाळ्यांचा कडकडाट करून आणि फटाके फोडून आनंद व्यक्त केला. त्यानंतर या विमानतळावर वाहतूक सुरु झालेली नाही.

