जादूटोण्याआड लुटणाऱ्या बाबाला अटक

शाहरुख नूर महंमद मदारी (वय २७, रा. काद्रीनगर, वैजापूर, जि. औरंगाबाद) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याचा साथिदार रशिद बुढन मदारी (रा. चाळीसगाव) हा दुचाकी घेऊन पसार झाला आहे. या प्रकरणी अरुण रामप्रताप गुप्ता (वय ३२, रा. चकगुरैनी, जि. कौशाम्बी, उत्तर प्रदेश) यांनी तक्रार दाखल केली आहे. गुप्ता गुजरात राज्यातील सिल्वासा येथील दमन प्लास्टिक कारखान्यातील कामगार आहेत. बुधवारी (दि.१३) सिल्वासा येथे जाण्यासाठी ते ठक्कर बाजार बसस्थानकात आले असता ही घटना घडली. दमन प्लॅटफार्मवर बसलेले असतांना दोघा भामट्यांनी त्यांना गाठले. हातचालखीने खाली पडलेल्या दगडाचे रुद्राक्ष करून त्यांनी गुप्ता यांचा विश्वास संपादन केला. साईभक्त असल्याचे भासवून संशयितांनी तुझे कल्याण करून देतो, असे सांगून गुप्ता यांनी परिधान केलेला टीशर्ट जसाचा तसा ताब्यात घेतला. यावेळी खिशातील वस्तूची गाठ बांधत संशयितांनी हालचालाखीने एक हजार रुपयांची रक्कम आणि मोबाईल लांबविला. ही बाब लक्षात येताच गुप्ता यांनी आरडाओरड केला. यावेळी गुन्हे शाखेा युनिट एकचे पोलिस कॉन्स्टेबल गौरव खांडरे हे तेथे गस्त घालत होते. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. खांडरे यांनी तातडीने संशयित शाहरुख नूर महंमद मदारी यास ताब्यात घेतले. त्याच्या जवळून चोरी केलेला मुद्देमाल तसेच एमएच १५, सीवाय ४००३ क्रमाकांची दुचाकी जप्त केली. त्याचा दुसरा साथिदार मात्र घटनास्थळावरून फरार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *