पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव सुरज गावळी असं आहे. हा तरुण अहमदाबादमधील चांदखेडा येथील रहीवाशी आहे. अहमदाबाद सायबर क्राइम पोलीस स्थानकामध्ये या मुलाविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे त्याला अटक करण्यात आली आहे. फसवणूक आणि महिलांवर नजर ठेवण्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलाय.
व्हॉट्सअॅपवरुन या तरुणीला सुरजने आपण इनर वेअर विकणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी असून मोफत कपडे हवे असल्यास पत्ता आणि इतर माहिती पाठवावी असं सांगितलं. त्यानंतर आठवडाभराने याच क्रमांकावरुन सुरजने तरुणीकडे कपड्यांची साईज काय आहे यासंदर्भातील माहितीसाठी फोटो पाठवण्यास सांगितले. या तरुणीने फोटो पाठवल्यानंतर सुरजने तिच्या न्यूड फोटोंची मागणी केली. याला तरुणीने नकार दिला. मात्र त्यानंतर तरुणीला शंका आल्याने तिने पोलिसांकडे तक्रार केली.
“या तरुणाने एका १८ वर्षीय मुलीवर नजर ठेवली होती. त्याने या मुलीला तू मोफत इनर वेअरसाठी पात्र असल्याचं सांगत तिला एका खोट्या स्कीमबद्दल सांगत तिच्याकडून खासगी माहिती मागवली. त्यानंतर त्याने या तरुणीकडे न्यूड फोटोंची मागणी केली. तरुणीने तातडीने पोलिसांकडे धाव घेत या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. यापूर्वीही या तरुणाने अशापद्धतीने इतर महिलांना गंडा घातला आहे,” असं पोलीस म्हणाले.
