देशात आधीच करोनाचा संकट असताना अनेक राज्य बर्ड फ्लूने बेजार

देशातील राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, केरळ या राज्यांत बर्ड फ्लू साथ वेगाने पसरत असतानाच ठाण्यातील वाघबीळ परिसरात १५ पाणबगळे मृतावस्थेत आढळल्याने काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पाणबगळ्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, याचा शोध घेतला जात आहे. आरोग्य यंत्रणेकडून या संपूर्ण प्रकारावर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे.

सदर पाणबगळ्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून त्याबाबत सविस्तर अहवाल पशुसंवर्धन रुग्णालय, मुंबई यांच्याकडून प्राप्त होईल असे पशुवैधकीय विभागातून कळवण्यात आले आहे. परंतु, सध्या केरळ व अन्य राज्यांत बर्ड फ्लूचे संकट घोंगावत असताना ठाण्यात पक्षांच्या मृत्यूच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि गोंधळ निर्माण झाला आहे. याबाबत घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आवाहन करण्यात आले आहे.

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाघबीळ परिसरातील विजय नगर, वाटिक इमारत येथून आज दुपारी साडेतीन वाजता पक्षांच्या मृत्यूची तक्रार आली होती. ही तक्रार प्राप्त होताच ठाणे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा घटनास्थळी १५ पाणबगळा जातीचे पक्षी मृत अवस्थेत आढळून आले. या पक्षांना पशुवैधकीय विभागामार्फत पशुसंवर्धन रुग्णालय  मुंबई येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *