दहावीतील विद्यार्थिनीचा शाळेत परीक्षेदरम्यान मृत्यू

वाशीतील मॉडर्न शाळेत दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा शाळेतच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. सायली अभिमान जगताप असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती चाचणी परीक्षा देण्यासाठी शाळेत गेली असताना हा प्रकार घडला. सायलीचा मृत्यू अभ्यासाच्या ताणातून झाल्याची शक्यता वर्तवली जात असली तरी नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 सायली ही रिपब्लिकन पक्षाचे तुर्भे विभाग अध्यक्ष अभिमान जगताप यांची कन्या असून ती तुर्भे स्टोअर्स विभागात राहत होती. मॉडर्न शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा सुरू असून सायली मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे परीक्षेसाठी शाळेत गेली होती. बॅग घेऊन परीक्षा हॉलमध्ये गेल्याने शिक्षकांनी तिला बॅग वर्गाबाहेर ठेवण्यास सांगितले. त्यानुसार सायली वर्गाबाहेर बॅग ठेवण्यासाठी गेली असता तिथेच अचानक कोसळून खाली पडली. सायलीला फिट आल्याचे समजून शाळेतील शिक्षकांनी तिला उचलून वर्गात नेले. त्यानंतर तिला वोक्हार्ट रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अभ्यासात हुशार असलेल्या सायलीचा अशा प्रकारे आकस्मिक मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *