अल्पवयीन मुलीवर दोघांचा अत्याचार

श्रीगोंदे तालुक्यातील चिंभळी गावातील एका वस्तीवरील अल्पवयीन मुलीवर दोघांनी लैंगिक अत्याचार केले. त्यातून पीडित मुलगी गर्भवती राहिली असून, याप्रकरणी तरुण, वृद्ध व्यक्तिंविरुद्ध बलात्कार, बालकांच्या लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार बेलवंडी पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

भानुदास गंगाराम भिसे (वय ३५), नामदेव अंबू अडागळे (वय ६०) अशी आरोपींची नावे असून, अडागळे याला अटक करण्यात आल्याची माहिती बेलवंडी पोलिस स्टेशनचे निरीक्षक अरविंद माने यांनी दिली. चौदा वर्षांची मुलगी आरोपींच्या घराजवळ राहायला आहे. भानुदास भिसे याने मुलीच्या घरात घुसून तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार अडागळे याने पाहिला होता. त्याने मुलीच्या घरात कोणी नसताना मुलीवर अत्याचार केला. मुलगी आजारी पडल्याने तिला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केल्यानंतर पीडित मुलगी गर्भवती असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पीडित मुलीने अत्याचार करणाऱ्यांची नावे आईला सांगितली. मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून शुक्रवारी बेलवंडी पोलिस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

असहायतेचा घेतला फायदा

आरोपी नामदेव अडागळे याने गावातील एकाची शेती कसण्यासाठी घेतली आहे. या शेतामध्ये पीडित मुलीची आई मजुरीचे काम करते. पीडित मुलीचे वडील भोळसर आहे. याचा फायदा दोन्ही आरोपींनी घेऊन मुलीवर अत्याचार केला आहे. अत्याचार केल्याचा प्रकार घरच्यांना सांगितल्यास त्यांना मारून टाकू, अशी धमकी आरोपींनी पीडित मुलीला दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *