अभिनेत्री काजल अग्रवालला भेटण्यासाठी चाहत्याने गमावले ६० लाख रुपये

अनेक चाहते आपल्या आवडत्या कलाकराला भेटण्याची स्वप्न पाहत असतात. कधी ही स्वप्ने सत्यात उतरतात तर कधी स्वप्न पूर्ण होताना अनेकांची फसवणूक होते. आता अशीच एक घटना समोर आली आहे. एका चाहत्याला आपल्या आवडत्या अभिनेत्रीला भेटवण्याचे अमिश दाखवून एका वेबपेजने ६० लाख रुपये उकळले आहेत.

रामनाथपुरम शहरामध्ये राहणारा एक व्यक्ती दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवालचा मोठा चाहता होता. त्याची काजलला भेटण्याची मनापासून इच्छा होती आणि त्यासाठी तो विविध संकेत स्थळावरुन माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान त्याला एका वेब पेजवर काजलला भेटण्याची ऑफर दिसली. चाहत्याने त्या वेब पेज चालवणाऱ्याशी संपर्क साधला आणि त्याची काजल अग्रवालला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्या व्यक्तीने चाहत्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर चाहत्याचे ओळखपत्र आणि फोटोची मागणी केली. आवडत्या अभिनेत्रीला भेटण्यासाठी उत्साही झालेल्या चाहत्याने कोणताही विचार न करता त्या व्यक्तीस माहिती दिली. गुन्हेगारांची टोळी हे वेब पेज चालवत होती. काजल अग्रवालचा चाहता या टोळीच्या सापळ्यात अडकला.

चाहता एका श्रीमंत घरातील आहे हे कळाल्यावर वेब पेज चालवणाऱ्यांनी त्याला काही दिवस अडकून ठेवले होते. परंतु काजलला भेटण्याची वेळ, पत्ता अशी कोणतीही माहिती पुरवली नाही. जेव्हा चाहत्याला त्याची फसवणूक होत असल्याचे कळाले तेव्हा त्याने पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली. पण वेबपेज सांभाळणाऱ्या व्यक्तींनी त्याने दिलेली वैयक्तिक माहिती लीक करण्याची धमकी दिली आणि त्याच्या कडून आणखी पैसे उकळले. जवळजळ ६० लाख रुपये गमावल्यानंतर चाहत्याने पोलिसांत तक्रार दाखल करुन त्याच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *