सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याची त्याच्या शाळेच्या आवारात धारदार चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये गुरुवारी घडली. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सातवीच्या वर्गात शिकणाऱा विद्यार्थी सुरजकुमार हा अहियारपूर येथील रहिवासी होता. त्याची गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या परिसरातच भोसकून हत्या करण्यात आली. शाळेच्या आवारातच घडलेल्या या धक्कादायक प्रकारानंतर या शाळेतील इतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेबाहेर जोरदार निदर्शने केली. तसेच काही संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शाळेत तोडफोड आणि जाळपोळ करीत हिंसाचार घडवून आणला.
या हत्येमागील कारण शोधण्यातही पोलिसांना यश आले असून मुजफ्फरपूरचे उप अधीक्षक मुकूल रंजन यांनी सांगितले की, ज्या तरुणाने सुरजकुमारची हत्या केली आहे त्याच्या मित्राने या घटनेच्या एक दिवसापूर्वी सुरजकुमारच्या आईचे पैशाचे पाकीट चोरले होते. आरोपी आणि सुरजकुमार हे दोघेही एकाच गावचे रहिवासी आहेत. संबंधित महिलेने आपले पैशाचे पाकीट चोरताना आरोपी तरुणाला रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर त्यांच्यात मोठा वाद झाला, त्यानंतर त्या महिलेने आरोपीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला तातडीने अटकही होती. मात्र, आपल्या सहकाऱ्याला तरुंगात जावे लागले याचा बदला घेण्यासाठी आरोपीच्या मित्राने संबंधित महिलेचा मुलगा सुरजकुमार याचा भोसकून खून केला.
शाळेची दुपारची जेवणाची सुट्टी झाली त्यावेळी सर्व मुले वर्गाबाहेर पडल्यानंतर दबा धरुन बसलेल्या आरोपीने सुरजकुमारच्या छातीत धारदार शस्त्राने अनेक वार केले. या हल्ल्यानंतर सुरजकुमारला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
