इंटरनेटच्या जमान्यात सध्या लग्नही ‘ऑनलाइन’ जुळविण्यावर सध्याच्या तरुण-तरुणींचा अधिक भर असतानाच या विश्वासाला तडा जाऊ शकेल, अशी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ‘शादी डॉट कॉम’ या विवाह जुळविणाऱ्या अग्रगण्य संस्थेच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या तरुण-तरुणींच्या छायाचित्रांशी छेडछाड करण्यात आली असून, ही छायाचित्रे मॉर्फिंग करून यूट्यूबवर अपलोड करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ताडदेव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमका किती जणांचा डेटा चोरीला गेला आहे, सदस्यांची माहितीची काळजी कशी घेण्यात येईल याबाबत अधिक तपशील मिळू शकलेला नाही. मात्र, आम्ही याबाबत यूट्यूब आणि पोलिसांना कळविले असून, असे कृत्य करणाऱ्याला पकडून त्याला कायद्याने शिक्षा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया ‘शादी डॉट कॉम’च्या प्रवक्त्याने दिली.
‘त्या’ लिंक हटविल्या
यूट्यूबवर अपलोड करण्यात आलेल्या व्हिडीओचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे छायाचित्रे आणि व्हिडिओच्या तीन लिंक तत्काळ हटविण्यात आल्या आहेत. ‘शादी डॉट कॉम’च्या सदस्यांपैकी कुणीतरी हा खोडसाळपणा केल्याचा संशय असून त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
