आईच्या गळ्याला चाकू लावून मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दोन आरोपींना २० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा भोकर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एम. एस. शेख यांनी बुधवारी सुनावली. आनंदा सावंत व कुणाल गायकवाड अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
उमरी येथे २६ नोव्हेंबर २०१८ रोजी ही घटना घडली होती. या दिवशी तीन आरोपींना पीडितेच्या घरात शिरून तिच्या आईच्या गळ्याला चाकू लावून रात्री एक ते पहाटे चारच्यादरम्यान, सामूहिक बलात्कार केला होता. या प्रकरणी आनंदा महादू सावंत, कुणाल ऊर्फ खंडू पांडुरंग गायकवाड यांच्याविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयात आठ साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्ष साक्षीदार आई व इतरांच्या साक्षीवरून न्यायालयाने आनंदा सावंत व कुणाल गायकवाड यांना प्रत्येकी २० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व आठ हजार रुपयांचा दंड सुनावला, तर एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
शहर पोलीस अधीक्षक नुरूल हसन व पोलीस उपअधीक्षक अभय देशपांडे यांनी प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. रमेश राजूरकर यांनी काम पाहिले.
