घरात सूनेवर वाईट नजर ठेवणाऱ्या सासऱ्याला विरार पोलिसांनी ठोकल्या बेडया

आपल्या सूनेवरच वाईट नजर ठेवणाऱ्या ५० वर्षीय सासऱ्याला विरार पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. काही दिवसांपूर्वी महिलेने नवऱ्याकडे त्याच्या वडिलांचे इरादे चांगले नसल्याची तक्रार केली होती. जेव्हा नवऱ्याने तिच्यावर विश्वास ठेवायला नकार दिला. तेव्हा तिने आरोपीच्या कृती कॅमेऱ्यात कैद करण्याचा निर्णय घेतला.

आरोपी पेशाने रिक्षाचालक आहे. आरोपी सासरा नेहमी स्वयंपाकघरात आपल्या सूनेचा विनयभंग करायचा. सासऱ्याच्या वर्तनाचे चित्रीकरण करण्यासाठी तिने स्वयंपाकघरात योग्य ठिकाणी मोबाइल फोनचा कॅमेरा सुरु करुन ठेवला. संध्याकाळी महिला स्वयंपाकघरात असताना सासरा तिथे आला व त्याने नको त्या ठिकाणी स्पर्श केला. त्याचे हे वर्तन कॅमेऱ्यात कैद झाले होते.

नवरा घरी आल्यानंतर तिने त्याला ती क्लिप दाखवली. मुलाने याबद्दल जेव्हा त्याच्या वडिलांना जाब विचारला तेव्हा त्यांनी मुलाला आणि सुनेला घर सोडून जाण्यास सांगितले अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. महिलेने त्यानंतर विरार पोलीस स्थानकात जाऊन सासऱ्याविरोधात एफआयआर नोंदवला. आम्ही आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे असे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *