एकाच कुटुंबातील तिघांची हत्या, शिर्डीत खळबळ

राहात तालुक्यातील निमगाव येथे वस्तीवर शनिवारी सकाळी एकाने एकाच कुटुंबातील तिघांची हत्याकेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. नामदेव ठाकूर, दगाबाई नामदेव ठाकूर, खुशी ठाकूर असे हत्या केलेल्यांची नावे आहेत. शेजारी राहणाऱ्यानेच हे हत्याकांड केले असून या हल्ल्यात दोघे जण बचावले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर शिर्डी संस्थान रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निमगाव शिवारात मंगेश कातोरे यांच्या वस्तीवर राहणाऱ्या ठाकूर कुटुंबीयांची हत्या करण्यात आली आहे. हा प्रकार शेजारीच राहणाऱ्या अर्जुन पन्हाळे याने केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. सकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली आहे.

आज सकाळी साडे सहाच्या सुमारास अर्जुन पन्हाळे यांनी कोयत्याने ठाकूर दाम्पत्याचे गळे कापले. तसेच शाळेत जाण्याची तयारी करत असलेल्या त्यांच्या १६ वर्षांच्या मुलीची देखील कोयत्यानं हत्या करण्यात आली. पन्हाळे यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे राजेंद्र ठाकूर (वय ३५ वर्षे) आणि तावू ठाकूर (वय १८वर्षे) अशी आहेत. या कुटुंबातील एक सहा वर्षांची मुलगी वाचली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. हत्येनंतर आरोपी शेजारीच असलेल्या त्याच्या खोलीत जाऊन बसला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या घटनेमुळे शिर्डी हादरून गेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *