वर्तकनगर परिसरातील एका १३ वर्षीय मुलीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची माहिती रु ग्णालय सूत्रांनी दिली. पालिकेच्या आरोग्य विभागानेही त्या मुलीचा मृत्यू हा डेंग्यूनेच झाल्याचे स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर या रुग्णाची माहिती उशिराने दिल्याने संबधित खाजगी रुग्णालयाला कारणे दाखवा नोटिस बजावणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. तर ज्या भागात ती राहत होती, त्या भागातील आजूबाजूच्या पाच नव्याने उभ्या राहत असलेल्या इमारतींमध्येही डेंग्यूच्या अळ्या आढळल्या असून विकासकांनाही नोटिसा बजावल्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी आर. टी. केंद्रे यांनी सांगितले.
खाजगी रुग्णालयांनी डेंग्यू किंवा इतर महत्त्वाच्या आजाराचा रुग्ण दाखल झाला असेल तर त्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु, रुग्ण मृत पावल्यानंतरही त्याची माहिती खाजगी रुग्णालयाने न दिल्याने त्यांनाही कारणे दाखवा नोटिस बजावली असून माहिती उशिरा कळविण्यामागचे कारण त्यात विचारल्याचे त्यांनी सांगितले.
