छेड काढताच तरुणीची रिक्षातून उडी!

विनयभंग करणाऱ्याचा प्रतिकार करीत तरुणीने रिक्षातूनच उडी घेत स्वत:ची सुटका केल्याचा प्रकार गुरुवारी अंबड येथे घडला. हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी रिक्षा रोखून चालकाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तमनगर येथील महाविद्यालयात प्रवेशप्रक्रिया पूर्ण करून एक तरुणी रिक्षाने (एमएच १५/एके ६६८५) घराकडे जात होती. मात्र, रिक्षाचालक रवी शंकर गोफन (वय २२, गौतमनगर) याने या तरुणीशी रिक्षा चालविताना अश्लील चाळे करून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तरुणी रिक्षात बसली असता रिक्षाचालकाने तिचा हात पकडून ‘तू मुझे अच्छी लगती है’ असं म्हणत तिची छेड काढली. त्याचवेळी तरुणीने रिक्षा थांबविण्यास सांगितले. मात्र, रिक्षा न थांबवल्यामुळे तरुणीने घाबरून रिक्षातूनच उडी घेतली. यामुळे तरुणीच्या हाताला व चेहऱ्याला दुखापत झाली. चालू रिक्षातून तरुणीने उडी घेतल्याचे पाहून परिसरातील नागरिकांना संशय आला. त्यांनी रिक्षाचालकास रोखून यथेच्छ चोप देत इंदिरानगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन रिक्षाचालकाला ताब्यात घेतले. या प्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली असून, पोलिस उपनिरीक्षक आदिनाथ मोरे तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *