चहाची होम डिलीवरी देण्याचा तरूणांचा व्यवसाय

भारतात चहाप्रेमींची कमी नाही. त्यात बसल्याजागी चहा हातात मिळत असेल तर कोण नाकारणार ? हीच कल्पना घेऊन लखनऊ मधील दोन तरूणांनी चहाची होम डिलीवरी सुरू केली आहे. उत्तर प्रदेशातील अनेक शहरात त्यांनी ही सेवा सुरू केली असून त्यांचा व्यवसाय कोट्यावधींच्या घरात खेळत आहे. अभिनव टंडन आणि प्रमित शर्मा या दोन तरूणांनी २०१४ मध्ये ‘चाय कॉलिंग’ या नावाने टपरी सारखं छोटेखानी चहाचं दुकान सुरू केलं. पिझ्झा आणि बर्गर प्रमाणे चहाची घरपोच सेवा देणं, हे या हॉटेलचं वेगळेपण होतं. काही वर्षांतच त्यांच्या व्यवसायाला बरकती आली आणि या हॉटेलची चक्क एक चेन सुरू झाली. आज संपुर्ण उत्तर प्रदेशात त्यांचे एकुण १५ टी-स्टॉल आहेत. यातून वर्षभरात सुमारे दोन कोटींचं उत्पन्न या दोघांना मिळतं.

अभिनव आणि प्रमित दोघांनीही अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं आहे. दोघेही एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होते. त्यानंतर स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याच्या हेतूने दोघांनी २०१४ साली नोएडा बरेलीतील नोएडा सेक्टर-१६ मेट्रो स्टेशन जवळ एक चहाची टपरी सुरू केली. ‘जेव्हा मी ऑफिसमध्ये काम करत होतो तेव्हा तिथे मशीनचा चहा मिळत असे. काही दिवसांतच मी या चहाला कंटाळलो आणि ऑफीस बाहेर एका टपरीवर जाऊन चहा पिऊ लागलो.’ असे अभिनवने सांगितले. तेथेच या दोघांना चहाची डिलीव्हरी करायची कल्पना सुचली.

‘चाय कॉलिंग’ची एक वेबसाइटही उपलब्ध आहे. आज १५ मिनीटांत चहाची डिलीवरी देण्याची सेवा ‘चाय कॉलिंग’द्वारे पुरवली जाते. ऑफिस मध्ये काम करणारे असंख्य कर्मचारी रोज यांच्या चहाचा आस्वाद घेत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *