दारू पिण्यास पैसे न दिल्याने खून

दारू पिण्यास पैसे न दिल्याने झालेल्या वादात तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना मामलेदार कचेरीजवळ सोमवारी पहाटे घडली. आरोपीने स्वत: हडपसर पोलिस ठाण्यात हजर होऊन हा प्रकार सांगितला. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन खडक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मात्र, खून झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही.

बाबासाहेब कुऱ्हाडे (वय ३५, रा. वैदूवाडी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत सहायक निरीक्षक जुबेरअहमद मुजावर यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुऱ्हाडे मध्यरात्री शिवाजी रस्त्यावर फिरत होता. फडगेट पोलिस चौकीजवळ रात्री अडीचच्या सुमारास तो सिगारेट पित थांबला होता. त्या वेळी तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीला आरोपी कुऱ्हाडेने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्याने आपल्याकडे २० रुपयेच असल्याचे सांगून पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर कुऱ्हाडेने त्याला शिवीगाळ केली. त्यानेही कुऱ्हाडेचा गळा धरून शिवीगाळ केली. वादावादी झाल्यानंतर तो तिथून गेला. तो मामलेदार कचेरीजवळील एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानासमोर झोपला. काही वेळाने कुऱ्हाडेही तिथून घरी जाण्यास निघाला असता त्याला ती व्यक्ती झोपलेली दिसली. कुऱ्हाडे स्वारगेट चौकापर्यंत गेला. मात्र, अचानक तेथून तो परत घटनास्थळी आला. त्याने त्या व्यक्तीच्या डोक्यात दोन-तीन वेळा दगड घातला. त्यानंतर कुऱ्हाडे तेथून थेट घरी गेला. आई आणि भावाला ही घटना त्याने सांगितली. त्या वेळी कुटुंबीयांनी त्याला बाहेर न जाण्याचा सल्ला दिला. परंतु, कुऱ्हाडे हा शौचास जाण्याचा बहाणा करून घराबाहेर पडला. तो थेट हडपसर पोलिस ठाण्यात आला. पोलिसांना घडलेला प्रकार त्याने सांगितला. यानंतर हडपसर पोलिसांनी खडक पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. कुऱ्हाडेला अटक करण्यात आली आहे. मयताची अद्याप ओळख पटलेली नाही. त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *