जम्मू-काश्मीरमधील पुलवामात १४ फेब्रुवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड मुदस्सिर अहमद खान याला आज, सोमवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी त्रालमधील चकमकीत ठार केलं. सुरक्षा दलाचं हे मोठं यश असल्याचं मानलं जातंय.
मुदस्सिरनं केली होती स्फोटकं आणि वाहनाची व्यवस्था
मुदस्सिर हा पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार असल्याचं सांगण्यात येतं. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, पुलवामात राहणारा २३ वर्षीय मुदस्सिर इलेक्ट्रिशन होता. तो पदवीधर होता. हल्ल्यात ज्या वाहनाचा वापर झाला होता, ते वाहन आणि स्फोटकांची व्यवस्था मुदस्सिरनंच केली होती. त्रालमधील मीर मोहल्ल्यात राहणारा मुदस्सिर २०१७मध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता.
आत्मघाती हल्लेखोर आदिलच्या संपर्कात होता मुदस्सिर
डिसेंबर २०१७मध्ये चकमकीत नूर मोहम्मद तांत्रे उर्फ नूर त्राली हा मारला गेल्यानंतर मुदस्सिर हा १४ जानेवारी २०१८ रोजी घरातून पसार झाला होता. त्यानंतर तो ‘जैश’मध्ये सक्रिय झाला होता. तो आत्मघाती हल्लेखोर आदिल अहमद डारच्या सातत्यानं संपर्कात होता. आदिलनंच स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्यातील बसला धडकवली होती, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
