ढेकूण झाल्याने पेस्ट कंट्रोल, दोघांचा गुदमरुन मृत्यू

ढेकूण घालवण्यासाठी घरात केलेले पेस्ट कंट्रोल दोघांच्या जीवावर बेतले. पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.  पुण्यातील एका महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये हे दोन तरुण काम करत होते. हॉटेल मालकानेच त्यांना राहण्यासाठी एक खोली दिली होती. या खोलीत ढेकूण झाल्याने तीन दिवसांपूर्वी पेस्ट कंट्रोल करण्यात आले होते.

खोली पेस्ट कंट्रोल केल्यानंतर ते तीन दिवस एका मित्राच्या घरी जाऊन राहिले होते. मंगळवारी रात्री ते परत आपल्या खोलीवर आले. दरम्यान बुधवारी बराच वेळ झाला तरी कामावर न आल्याने कॅन्टीन मॅनेजरने त्यांच्या खोलीवर येऊन पाहिले असता दरवाजा आतून बंद होता. खिडकीतून पाहिले असता दोघेही झोपले असल्याचे दिसून आले. त्यानंतर कॅन्टीन मॅनेजरने दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि दोघांनाही रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती पोलिसांनी दिली. तपासणीअंती डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केल्याचे पोलिसांकडून सागण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *