भारतीय हवाई दलातील विंगकमांडर अभिनंदन वर्धमान यांना हिंदू एकताच्या वतीने धर्मवीर संभाजी महाराज मृत्युंजय पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा समस्त हिंदु आघाडीचे मिलिंद एकबोटे यांनी शनिशिंगणापूर येथे केली. ५ एप्रिल रोजी होणाऱ्या सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
शनीशिंगणापूर येथे महाशिवरात्री निमित्ताने एकबोटे यांनी शनिदेवाचे दर्शन घेऊन अभिषेक केला. त्यानंतर त्यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. यावेळी वारकरी शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे, सागर ठोंबरे, साईनाथ हुळहुळे, सागर डांगरे, ऋषिकेश लगड, अजय चौधरी, विशाल लोखंडे आदी उपस्थित होते.
एकबोटे पुढे म्हणाले, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सूचनेनुसार संभाजी महाराज यांच्या समाधीजवळ फाल्गुन अमावास्येला मृत्युंजय दिन साजरा केला जातो. या दिवशी महाराजांनी बलिदान दिले. दरवर्षी हिंदू एकताच्यावतीने धर्म व राष्ट्रासाठी काम करणाऱ्यांना पुरस्कार दिला जातो. मागील वर्षी मी तुरुंगात असल्याने पुरस्कार वितरण झाले नव्हते. यंदा हा पुरस्कार अभिनंदन यांना देण्यात आला आहे. एक लाख रुपये रोख, चांदीचे स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असल्याचे त्यांनी सांगितले.
