अंदमानात दाखल झालेला मोसमी पाऊस मंगळवारी केरळमध्ये दाखल झाला असून ६ ते १० जून दरम्यान पाऊस राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी पावसाने ३० मे रोजी केरळमध्ये प्रवेश केला होता. यावर्षी पावसाने एक दिवस अगोदरच केरळमध्ये प्रवेश केला आहे.
अरबी समुद्रातील मेकुनू चक्रीवादळ पूर्णपणे निवळल्यानंतर मोसमी पावसावरील संकट दूर झाले होते. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने मोसमी पावसासाठी हे पोषक वातावरण मानले जाते. २५ मे रोजी अंदमानात दाखल झालेला मोसमी पाऊस सोमवारी केरळच्या दक्षिणेस पोहोचला होता. मंगळवारी मोसमी पावसाचे केरळमध्ये आगमन झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली.
गेल्या वर्षी राज्यावर पावसाने कृपादृष्टी केल्याने मे महिन्यातही पाण्याचा तुटवडा जाणवला नाही. मात्र तरीही पावसाकडे साऱ्यांची नजर लागली होती. केंद्रीय हवामानशास्त्र विभागाकडून २००५ पासून पावसाच्या प्रवेशाची तारीख जाहीर केली जाते. प्रवेशाच्या अंदाजात चार दिवसांचा फरक पडू शकतो. गेल्या १४ वर्षांत (२००५ ते २०१८) केवळ २००५ या अपवाद वगळता केंद्रीय वेधशाळेचे अंदाज योग्य ठरले आहेत, असा दावा विभागाकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. रत्नागिरीतही मंगळवारी पावसाने हजेरी लावली.
