ठाणे येथील माजीवाडा भागातील मुंबई-नाशिक महामार्गालगत उभे असलेल्या तृतीयपंथींना महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला. या तृतीयपंथींकडून अनैतिक प्रकार करण्यासोबत वाहनचालकांना लुटण्याचे प्रकार सुरू असल्याच्या संशयावरून ही मारहाण करण्यात आल्याचा दावा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तृतीयपंथींना झालेल्या मारहाणप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्य़ात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
माजीवाडा भागातील मुंबई-नाशिक महामार्गालगत रविवारी रात्री तृतीयपंथी उभे होते. त्या वेळेस तिथे आलेल्या १५ ते २० मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. मारहाण करणाऱ्यांमध्ये पाच ते सहा महिलांचाही समावेश होता. यापुढे या ठिकाणी थांबायचे नाही, असे सांगत मनसे कार्यकर्त्यांनी तृतीयपंथींना बेदम मारहाण केली. याप्रकरणी तृतीयपंथींनी दिलेल्या तक्रारीवरून कापूरबावडी पोलीस ठाण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रात्रीच्या वेळेस माजिवाडा भागातील रस्त्यालगत तृतीयपंथी उभे राहायचे आणि त्या ठिकाणी अंधारामध्ये अनैतिक प्रकार करायचे. तसेच या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना अडवून त्यांच्याकडील ऐवज लुटायचे. त्याचप्रमाणे तृतीयपंथींच्या अनैतिक प्रकारांमुळे परिसरातील गृहसंकुलामधील रहिवाशी हैराण झाले होते. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आल्याचा दावा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
