हॉटेलमध्ये निवासासाठी रुम बुक केल्यानंतर पुरावा म्हणून ओळखपत्र दाखवणे आवश्यक आहे. पण अंधेरी पश्चिमेला एका हॉटेलमध्ये अविवाहित असल्याच्या कारणावरुन एका जोडप्याला प्रवेश नाकारण्यात आल्याची घटना घडली आहे. भारतीय महिला आणि तिच्या दक्षिण अमेरिकन प्रियकराला अंधेरीच्या फॅब हॉटेल पंचवटी रेसीडन्सीमध्ये अविवाहित असल्याच्या कारणावरुन शनिवारी दुपारी प्रवेश नाकारण्यात आला.
हॉटेलमध्ये चेक इन करत असताना हे जोडपे अविवाहित असल्याचे स्टाफच्या लक्षात आले. स्टाफने इथे रुम मिळणार नाही असे या जोडप्याला सांगितले. या जोडप्याने काही महिने आधी पैसे भरुन ऑनलाइन रुम बुक केली होती. ते पैसे सुद्धा परत करण्यास नकार दिला. भारतीय महिला आणि तिचा प्रियकर उच्चशिक्षित असून युकेमधल्या एका प्रतिष्ठीत कॉलेजमधून त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशनची पदवी घेतली आहे.
अविवाहित जोडप्याने रुम न देण्याचे आपले धोरण असल्याचे त्यांना हॉटेलकडून सांगण्यात आले. सदर महिला दिल्लीची आहे. युकेमध्ये शिक्षण घेत असताना दोघांची ओळख झाली होती. तिचा प्रियकर पहिल्यांदाच भारतात आला आहे. शनिवारी दुपारी मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर टॅक्सीपकडून ते हॉटेलमध्ये आले. त्यांनी चेक इन करताना काऊंटरवर आपले आयडी कार्ड दाखवले.
स्टाफने आमच्याकडे पाहिल्यानंतर आम्ही अविवाहित असल्याचे त्यांच्या लक्षात आले व त्यांनी रुम मिळणार नाही असे सांगितले. मुंबईत येण्याआधी आम्ही दिल्ली, जयपूर, उदयपूर येथे एकत्र फिरलो, राहिलो पण तिथे अशी कुठलीही समस्या आली नाही असे महिलेने सांगितले.
