विद्यार्थ्यांच्या पासदरात वाढ
बेस्ट उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या प्रवास भाडय़ातही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या भाडेवाढीनुसार इयत्ता पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मासिक पाससाठी २०० रुपये, त्रमासिक पाससाठी ६०० रुपये, तर सहामाही पाससाठी एक हजार रुपये मोजावे लागणार आहेत. इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा मासिक पास २५० रुपये, त्रमासिक पास ७५० रुपये, तर सहामाही पास १२५० रुपये करण्यात आला आहे. इयत्ता ११ वी, १२ वी आणि पदविका अभ्यासक्रमांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मासिक पास ३५० रुपये, त्रमासिक पास १०५० रुपये, तर सहामाही पास १७५० करण्यात आला आहे.
‘मॅजिक बस पास’
मॅजिक बस पास योजनेअंतर्गत शहरामध्ये माहीम, शीव, आणिक आगारापर्यंत प्रवास करण्यासाठी दैनंदिन पासपोटी ५० रुपये मासिक पाससाठी ११०० रुपये, तर त्रमासिक पाससाठी ३३०० रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. माहीम, शीव, आणिक आगारापासून पुढे प्रवास करण्यासाठी दैनंदिन पाससाठी ६० रुपये, मासिक पाससाठी १३२० रुपये, तर त्रमासिक पाससाठी ३९६० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर संपूर्ण मुंबईमध्ये विनावातानुकूलित बसमधून दिवसभराच्या प्रवासासाठी ९० रुपयांचा दैनंदिन पास घ्यावा लागणार आहे. तसेच १९८० मासिक, तर ५९४० रुपये त्रमासिक पाससाठी मोजावे लागणार आहेत.
डबघाईला आलेल्या ‘बेस्ट’ उपक्रमाला सावरण्यासाठी बेस्ट समिती, पालिका सभागृहाने मंजुरी दिलेल्या बेस्ट बस भाडेवाढीला अखेर मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाकडूनही हिरवा कंदील दाखविण्यात आला. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने तात्काळ गुरुवारपासून बेस्ट भाडेवाढीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुरुवारपासून बेस्टचा प्रवास महागणार आहे.
बेस्टचा आर्थिक डोलारा सावरण्यासाठी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी उपक्रमामध्ये काही आर्थिक सुधारणा सुचविल्या होत्या. त्याचाच एक भाग म्हणून उपक्रमाच्या तिकीट दरांत वाढ प्रस्तावित करण्यात आली होती. तिला बेस्ट समिती व पालिका सभागृहाकडून मंजुरी मिळाल्यानंतर आता मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणानेही भाडेवाढीस परवानगी दिली. त्यामुळे गुरुवार, १२ एप्रिलपासून ही भाडेवाढ अमलात आणण्याचे जाहीर करण्यात आले.

भाडेवाढीच्या प्रस्तावानुसार सर्वसाधारण, मर्यादित आणि जलद बस सेवांच्या चार कि.मी.पेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी भाढेवाढ करण्यात येणार आहे. मासिक आणि त्रमासिक पासमध्येही अशीच टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात आली असून आता सहा कि.मी. अंतराच्या मासिक पाससाठी ६६०, तर त्रमासिक पाससाठी १९८० रुपये मोजावे लागणार आहेत. या भाडेवाढीमुळे ३५ कि.मी. अंतरासाठीचा मासिक पास २०७० रुपये, तर त्रमासिक पास ६२१० रुपयांवर पोहोचला आहे.
पथकर नाक्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून (बस पासधारक) सर्वसाधारण आणि मर्यादित बस सेवांवर ५० रुपये, तर वातानुकूलित बससेवांवर १०० रुपये प्रतिमहिना अतिरिक्त आकारणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पथकर नाक्यावरून ये-जा करणाऱ्या सर्वसाधारण, मर्यादित आणि जलद बस सेवांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून अतिरिक्त एक रुपया, तर वातानुकूलित बस सेवांवर पाच रुपये अतिरिक्त प्रवास भाडे आकारण्यात येणार आहे.
बेस्ट उपक्रमातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी बेस्ट भाडय़ात ५० टक्के सवलत देण्याची योजना प्रस्तावित आहे. या योजनेची अंमलबजावणी होईपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना वातानुकूलित बस सेवा वगळून अन्य सर्व प्रकारच्या मासिक बस पासमध्ये ५० रुपये, तर त्रमासिक बस पासमध्ये २०० रुपये सवलत देण्यात येणार आहे.
