नीरव मोदी हाँगकाँगमध्ये ? अटकेसाठी केंद्र सरकारची विनंती

पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) १३ हजार कोटींचा गंडा घालणारा मुख्य संशयित आरोपी नीरव मोदी हाँगकाँगमध्ये असण्याची शक्यता आहे. परराष्ट्र मंत्रालयाने हाँगकाँग प्रशासनाला नीरव मोदीच्या तात्पुरत्या अटकेसाठी (प्रोव्हिजनल अरेस्ट) विनंती केली आहे. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के.सिंग यांनी राज्यसभेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. चीनच्या विशेष प्रशासनिक क्षेत्रात असलेल्या हाँगकाँगच्या सरकारकडे नीरव मोदीच्या तात्पुरत्या अटकेची मागणी करण्यात आली आहे. दि. २३ मार्च रोजी याबाबत विनंती पत्र पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

नीरव मोदी आणि मेहुल चौकसी सध्या कुठे आहेत याची परराष्ट्र मंत्रालयाला माहिती आहे का, असा सवाल व्ही.के.सिंग यांना विचारण्यात आला होता. तात्पुरत्या अटकेनंतर औपचारिकरित्या प्रत्यार्पणाची विनंती करता येऊ शकते. मोदी आणि चौकसीचा पासपोर्ट रद्द करण्यात आल्याचे सिंग यांनी सांगितले.

दोन महिन्यांपूर्वी पीएनबीत हजारो कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी सीबीआयने या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा घोटाळा समोर आल्यानंतर मोदी आणि चौकसीने देशातून पलायन केले होते.

त्यानंतर १६ फेब्रुवारी रोजी परराष्ट्र मंत्रालयाने या दोघांना कारणे दाखवा नोटीस पाठवून एक आठवड्याच्या आत उत्तर देण्यास सांगितले होते. परंतु, त्यांनी निर्धारित वेळेत उत्तर दिले नाही. त्यामुळे २३ फेब्रुवारी रोजी त्यांचा पासपोर्ट रद्द करण्यात आला होता, असे सिंग म्हणाले.

तात्पुरती अटक ही प्रत्यार्पणापूर्वीची एक प्रक्रिया आहे. त्यानंतर वाँटेड व्यक्तीभोवती कारवाईचा फास आवळला जातो. तो कुठेही असेल तेथून त्याला अटक करता येऊ शकते. त्यानंतर त्याच्या पळून जाण्याचे सर्व मार्ग बंद केले जातात आणि प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू केली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *