फेसबुकवर मैत्री करून गंडा घालणारी टोळी सक्रिय

फेसबुकवरून श्रीमंत व्यक्ती हेरून त्यांना गंडा घालणारी टोळी सक्रिय झाली आहे. वसईतील माणिकपूर पोलिसांनी अशाच एका टोळीतील एका ठकसेनाला अटक केली आहे. अमेरिकी डॉलर निम्म्या किमतीत देण्याचे आमिष दाखवून ते या लोकांची आर्थिक फसवणूक करत आहेत. मुंबई तसेच वसई-विरारमधील अनेकांना त्यांनी अशा प्रकारे लाखो रुपयांना गंडा घातला आहे.

समाजमाध्यमावर तसेच समाजात वावरताना श्रीमंतीचा बडेजाव मिरवणे धोकादायक असते. अनेक जण फेसबुकवर आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करत असतात. कळत-नकळत ते माहिती देत असतात. अशा लोकांना ठकसेन हेरतात. वसईच्या माणिकपूर पोलिसांनी अशाच एका ठकसेनाच्या टोळीत एकाला अटक केली आहे. फेसबुकवरून श्रीमंत लोकांना हेरायचे आणि त्यांना अमेरिकी डॉलर निम्म्या किमतीत देतो, असे सांगून गंडवण्याची त्यांची पद्धत होती. माणिकपूर आणि वालीव पोलीस ठाण्यात अशा फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल होते. परंतु अनेक लोकांना त्यांनी गंडवले आहे.

वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्याने या टोळीतील एका ठकसेनाला अटक केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ही टोळी फेसबुकवरून श्रीमंत वाटणारी माणसे हेरायची. ट्रेनमधून प्रवास करून श्रीमंतींच्या गप्पा मारणाऱ्या माणसांशी मैत्री करायचे. आपल्याकडे अमेरिकी डॉलर आहेत आणि पैशांची गरज असल्याने निम्म्या किमतीत देतो, असे सांगायचे. सुरुवातीला थोडे अमेरिकी डॉलर द्यायचे आणि विश्वास बसल्यावर लाखो रुपयांचे अमेरिकी डॉलर निम्मा किमतीत देण्याचे आमिष दाखवायचे. अमेरिकी डॉलर्स देताना वर खरे डॉलर आणि आत कागदी नोटांचे बंडल ठेवून गंडा घालत होते. वसई-विरारमधील अनेकांना त्यांनी अशा प्रकारे गंडा घातला आहे. त्यात उद्योजक, हेल्थ केअर चालवणारे व्यवस्थापक, व्यापारी आदींचा समावेश आहे. या टोळीत एकूण पाच जण होते. ते नालासोपारा पूर्वेच्या प्रगतीनगर येथे राहत होते. मात्र इतर साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *