ओव्हरटेक केल्याच्या रागात बसचालकाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण

ओव्हरटेक केल्याच्या रागातून बसचालकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. केरळमधील पलाक्कड येथे ही घटना घडली आहे. बसचालकाने धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक केल्यानंतर कारमधील तरुणांनी बस थांबवत बेदम मारहाण केली. मारहाणीत बसचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान पोलिसांनी मारहाण करणा-या तीन तरुणांना ताब्यात घेतलं आहे.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही तरुण कारने लग्नाच्या पार्टीसाठी जात होते. यावेळी केरळ राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या बसचालकाने त्यांना ओव्हरटेक केलं. यानंतर तरुणांनी रागाच्या भरात बस थांबवून चालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. कंडक्टर आणि इतर प्रवाशांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण तीन तरुण दरवाजा उघडून चालकाच्या केबिनमध्ये घुसले आणि जबरदस्त मारहाण केली.

मारहाण करणा-या तरुणांपैकी एकाने चालकाच्या तोंडावर जोरात मुक्का मारल्याने तो रक्तबंबाळ झाला. सध्या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत. पोलिसांनी याप्रकरणी तीन तरुणांना ताब्यात घेतलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *