ठाणेः पोलिसांना गुंगारा देऊन आरोपी पळाला

हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला. कोर्टाच्या परिसरातून पळून जाण्यात आरोपी यशस्वी झाल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मनवर मुल्ला असं या आरोपीचं नाव असून त्याला विरार पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली अटक केले होते व ठाणे कारागृहात ठेवले होते. मनवर मुल्लाला मंगळवारी ठाणे कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाच्या सुनावणीनंतर सायंकाळी त्याला पालघर पोलीस ठाण्यात घेऊन आल्यानंतर गाडीतून उतरताच त्यानं पोलिसांना गुंगारा देत त्या ठिकाणाहून पळ काढला. मनवर मुल्लानं पळ काढल्याचं पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी त्याचा शोध घेतला परंतु तो पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *