हवेत गोळीबार करुन पेट्रोल पंपावर दरोडा

सशस्त्र दरोडेखोरांनी हवेत गोळीबार करुन पेट्रोल पंपावर दरोडा टाकला. कर्मचाऱ्यांना मारहाण करीत त्यांनी २५ हजाराची रोकडही लुटली. त्यानंतर पोबारा करण्याच्या तयारीत असलेल्या या दरोडेखोरांना पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. वडगाव हवेली येथे शनिवारी पहाटे  हे थरारनाट्य घडले.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, कराड-तासगाव मार्गावर वडगाव हवेली गावच्या हद्दीत पेट्रोल पंप आहे. शुक्रवारी रात्री तेथील कर्मचारी पंप बंद करुन झोपले असताना पहाटेच्या सुमारास सहा दरोडेखोर दुचाकींवरुन तेथे आले. त्यांनी हवेत गोळीबार करीत कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या हल्ल्याने कर्मचारी घाबरले. त्यांनी ड्राव्हरमधील २५ हजाराची रोकड काढून दरोडेखोराना दिली. त्यानंतर दरोडेखोरांनी तासगावच्या दिशेने पोबारा केला.

दरम्यान पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी तातडीने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिस ठाण्यातून वायरलेस यंत्रणेवरुन ही माहिती गस्तीवरील पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिस पथकाने थरारकरीत्या पाठलाग करीत दरोडेखोरांच्या टोळीला पकडले. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *