विवाहाच्या आमिषाने १३ तरुणींना गंडा

विवाहविषयक संकेतस्थळावर बनावट खाते; ठाण्यातील ठकसेनला बेडय़ा

एका विवाहविषयक संकेतस्थळावरून बनावट खाते तयार करून तब्बल १३ तरुणींची फसवणूक करणाऱ्या एका ठकसेनाला नालासोपारा पोलिसांनी बेडय़ा घातल्या. या तरुणींना २५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. हा आरोपी विवाहित असून गेल्या पाच वर्षांपासून हे गुन्हे करत असला तरी आजवर एकदाही पकडला गेला नव्हता.

कृष्णा देवकाते (३०) हा आरोपी ठाण्यात पत्नी आणि मुलासह राहतो. त्याने शादी डॉट कॉम आणि जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळावर आपले बनावट खाते तयार केले होते. रिलायन्स कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी असून महिन्याला लाखो रुपये पगार असल्याचे त्याने भासवले होते. मुंबई आणि विविध ठिकाणी उच्चभ्रू वसाहतीत सदनिका, बंगले, वडिलोपार्जित जमीन आणि शेती असल्याचे त्याने लिहिले होते. आई-वडील हयात नसून एकुलता एक मुलगा असल्याचे लिहिले होते. त्याच्या प्रोफाईलला अनेक मुली भाळल्या होत्या. नालासोपारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा आरोपी नोकरदार आणि श्रीमंत मुलींना आपले सावज बनवत असे. मुलींना भेटायला तो हॉटेलात बोलवायचा आणि लग्नास तात्काळ होकार द्यायचा. त्या काळात तो विविध कारण दाखवून मुलींकडून पैसे घ्यायचा. व्यवसायात मंदी, क्रेडिट कार्ड ब्लॉक झाले, शेअर बाजारात भरायचे आहेत, असे सांगून तो पैसे उकळायचा. त्यानंतर आपला मोबाइल कायमस्वरूपी बंद करून पळ काढायचा.

नालासोपारा येथील ४० वर्षीय पीडित महिलेने त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ही महिला उच्चशिक्षित आणि बहुराष्ट्रीय कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी आहे. आरोपी देवकाते याने तिला संकेतस्थळावरून लग्नास होकार दिला. तिच्याकडून नऊ लाख रुपये उकळले होते. तो तिच्या कुटुंबीयांनाही भेटून आला होता. मात्र पैसे घेतल्यावर तो अचानक पळून गेला. नालासोपारा विभागाचे पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव आणि साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या विशेष पथकाने देवकाते याला ठाणे येथून अटक केली. पाच वर्षांत देवकाते याने अनेक मुलींची अशा प्रकारे फसवणूक केल्याचे उपअधीक्षक देवकाते यांनी सांगितले.

श्रीमंतीचा बनावट थाट

आरोपी सफाईदार इंग्रजी बोलायचा. त्यामुळे त्यावर कुणाचा संशय येत नव्हता. त्याने आपल्या फेसबुक खात्यावरही श्रीमंतीचा बनवाट थाट उभा केला होता. त्यामुळे मुली फसत गेल्या, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी सांगितले.

तपास सुरू

देवकाते याने अनेक मुलींशी अश्लिल चॅटिंग केलेले आहे. त्यामुळे त्याने कुणाशी शरीरसंबंध ठेवले आहे का त्याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तो पाच वर्षांपासून मुलींना अशा प्रकारे फसवत आहे, परंतु आजवर एकदाही पकडला गेला नव्हता. त्याला ११ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *