रूग्णालयाचे बिल देण्यासाठी पैसे नसलेल्या एका दांपत्यावर आपल्या नवजात मुलीला विकण्याची वेळ आली. ओडिशा येथील केंद्रपाडा जिल्ह्यातील ही दुर्दैवी घटना असून या दांपत्याने एका अपत्यहीन दांपत्याला आपली नवजात मुलगी साडेसात हजार रूपयांना विकली. गावातील ‘आशा’ कायकर्ता महिलेने आपल्याला नवजात बाळ विकण्याचा सल्ला दिल्याचा आरोप त्या मुलीचे वडील निराकर मोहराना यांनी केला असून याप्रकरणी शुक्रवारी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. संशयित ‘आशा’ कार्यकर्ता असलेल्या महिलेने मोहराना यांना एका खासगी नर्सिंग होममध्ये दाखल होण्यास भाग पाडले. त्याचे बिल देण्यासाठी मुलीला विकण्यात आले, असा आरोप पीडित मोहराना यांनी केला आहे. दरम्यान, त्या नर्सिंग होमने या बाबत प्रतिक्रिया दिलेली नाही.
मोहराना आणि त्याची पत्नी गीतांजली हे राजनगर तालुक्यातील रिघागड गावातील रहिवासी आहेत. ते ३० जुलै रोजी आपल्या तिसऱ्या अपत्याच्या प्रसूतीसाठी जिल्हा रूग्णालयात दाखल झाले होते. पण गावातील ‘आशा’ महिला कार्यकर्ताने त्यांना चांगल्या उपचारासाठी खासगी रूग्णालयात जाण्यास भाग पाडले. एक ऑगस्ट रोजी त्यांनी गीतांजलीने एका मुलीला जन्म दिला, असे मोहरानाने सांगितले.
मला सरकारी रूग्णालयाप्रमाणेच खासगी रूग्णालयातही मोफत उपचार असतील असे वाटले. पण मला नंतर साडेसात हजाराचे बिल देण्यास सांगण्यात आले. त्यावेळी माझ्याकडे एक हजार रूपयांपेक्षाही कमी पैसे होते. बिलाचे सर्व पैसे दिल्याशिवाय जाऊ देणार नसल्याचे त्या रूग्णालयातून सांगण्यात आले, असे मोहरानाने सांगितले. त्यावेळी रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मला अपत्यहीन दांपत्याला मुलगी विकण्याचा सल्ला दिला. दुसरा कोणताही पर्याय नसल्याने आम्हा दोघांच्या इच्छेविरोधात मुलीला विकावे लागल्याचे मोहरानाने सांगितले.
