जगातील सर्वात उंच टॉवरपैकी एक असलेल्या दुबईतील ७४ मजली टॉर्च टॉवरला आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. आग लागल्याचं कळताच टॉवरमधील सर्व रहिवासी बाहेर पडले आहेत. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. फेब्रुवारी २०१५ मध्येही या टॉवरला भीषण आग लागली होती.
दुबईतील टॉर्च टॉवर जगातील सर्वात उंच टॉवरपैकी एक आहे. १,१०५ फूट उंच असलेल्या या टॉवरला शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास भीषण आग लागली. आग लागल्याचे समजताच लगेच सर्व रहिवासी बाहेर पडले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आम्ही सर्व जण झोपलो होतो. आग लागल्याचा अलार्म वाजल्यानंतर सर्व खडबडून जागे झालो. टॉवरमधील सर्व रहिवासी लगेच बाहेर पडले. ५०व्या मजल्यावरून अवघ्या दहा मिनिटांतच आम्ही बाहेर पडलो, अशी माहिती जॉर्ज या रहिवाशानं दिली. आग खूपच भीषण होती. ६७ व्या मजल्यावर आग लागल्याचं आम्हाला सांगण्यात आलं, अशी माहितीही त्यानं दिली. वरच्या मजल्यांवर आग लागली. त्यानंतर टॉवरचा जळालेला काही भाग खाली कोसळला. त्यामुळं खालच्या मजल्यांवरही आग पसरली, असं १२ व्या मजल्यावरील रहिवासी मोहम्मद यांनी सांगितलं.
दरम्यान, आगीवर नियंंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आल्याचं दुबईच्या मीडिया ऑफिसनं म्हटलं आहे. ‘कुलिंग ऑपरेशन’ सुरू आहे. सुदैवानं या दुर्घटनेत कुणीही जखमी झालं नाही, अशीही माहिती देण्यात आली.
