मुंबईतील दाटीवाटीच्या परिसरात तसेच अरुंद गल्लीबोळांमध्ये मोठय़ा रुग्णवाहिका पोहोचण्यात येणाऱ्या अडचणी पाहून दुचाकी रुग्णवाहिका (बाइक अॅम्ब्युलन्स) सुरू करण्याची आरोग्य विभागाची योजना पहिल्याच दिवशी उपयुक्त ठरली. या रुग्णवाहिकांच्या मदतीने गोवंडी आणि गोरेगाव येथील दाटीवाटीच्या परिसरातील दोन रुग्णांना तातडीने रुग्णालयात पोहोचवण्यात यश आले असून वेळेत वैद्यकीय उपचार मिळाल्याने या रुग्णांचे प्राण वाचले आहेत.
गुरुवारी सकाळी गोवंडी येथील एका १६ वर्षांचा मुलगा तापाने फणफणत होता. गोवंडी परिसरातील गल्लीबोळांमध्ये मोठी रुग्णवाहिका नेता येत नाही. त्यामुळे या मुलाच्या नातेवाईकांनी १०८ या क्रमांकावर दूरध्वनी करून दुचाकी रुग्णवाहिकेला बोलावून घेतले. ही रुग्णवाहिका साधारण १० मिनिटांत घटनास्थळी दाखल झाली व या दुचाकीवरील प्रशिक्षकाने मुलावर तात्काळ उपचार केले. तापामुळे मुलगा बेशुद्ध अवस्थेत होता. प्रथमोपचार केल्यानंतर तो थोडाफार शुद्धीवर आला. नंतर त्याला मोठी रुग्णवाहिका जिथपर्यंत येऊ शकेल तिथपर्यंत दुचाकीवर बसवून नेण्यात आले. मोठय़ा रुग्णवाहिकेच्या मदतीने त्याला जवळील रग्णालयात हलविण्यात आले.
गोरेगाव येथील ६९ वर्षांच्या व्यक्तीला गुरुवारी दुपारी पक्षाघाताचा झटका आला होता. त्यांच्या कुटुंबीयांनी तात्काळ १०८ या क्रमांकावर दूरध्वनी करून दुचाकी रुग्णवाहिकेची मदत मागवली. ही रुग्णवाहिका गोरेगावच्या सरकारी कार्यालयाजवळच उभी होती. काही मिनिटांत या व्यक्तीला प्रथमोपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला. प्रथमोपचार घेतल्यानंतर त्यांना जवळील मोठय़ा रुग्णालयात हलविण्यात आले.
- भांडुप, मालाड, मानखुर्द, गोरेगाव, नागपाडा, चारकोप, ठाकूरगाव, कलिना, खारदांडा भागात या दहा दुचाकी रुग्णवाहिका सुरू झाल्या आहे.
- १०८ क्रमांकाची हेल्पलाइन ही सेवा चोवीस तास उपलब्ध असणार आहे. रेल्वे स्थानके, अग्निशमन केंद्र या ठिकाणी या दुचाकी तैनात असतील.
वैद्यकीय साधने
दुचाकी रुग्णवाहिकेच्या मागील बाजूच्या पेटीत प्राथमिक औषधोपचाराची साधनसामग्री आहेत. यांचा उपयोग रस्त्यावरील अपघातांव्यतिरिक्त हृदयविकार, विषबाधा, दमा या आजारांवर तसेच नैसर्गिक आपत्तीत सापडलेले रुग्ण यांच्यावर उपचार करता येईल.
