हिरे चोरणाऱ्या चिनी नागरिकांना अटक

शॅम्पूच्या बॉटलमध्ये घालून हिरे चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन चिनी नागरिकांना मुंबई पोलिसांनी विमानतळावर अटक केली आहे. हे दोघेही देश सोडण्याच्या तयारीत होते. त्यांच्याकडून ५.४ कॅरेटचे ३४ लाख किंमतींचे हिऱ्यांसह पासपोर्ट व मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.

चियांग चांग क्विंग आणि डेंग जियाबो अशी या आरोपींची नावं आहेत. पोलीस उपायुक्त विनय कुमार राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ते ३१ जुलै दरम्यान इंडिया इंटरनॅशनल जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी असोसिएशननं भरवलेल्या प्रदर्शनात देश-विदेशातील सराफा व्यावसायिक हिरे, हिरेजडित दागिने घेऊन सहभागी झाले होते. हिरे आणि दागिण्यांचे प्रदर्शन असल्यानं चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती.

अटक करण्यात आलेले दोघेही रविवारी सकाळी प्रदर्शनात सहभागी झाले होते. एकाच स्टॉलवर ते खूप वेळ रेंगाळले. त्यांनी हिरे पाहिले व नंतर ते ठेवून निघून गेले. संध्याकाळच्या सुमारास प्रदर्शन संपल्यानंतर आवराआवर करताना एक हिरा बोगस असल्याचं स्टॉलवरील कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्यानं त्यानं तात्काळ आपल्या वरिष्ठांना कळवलं. याबाबत पोलिसांना कळवल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक ज्योत्स्ना रासम, निरीक्षक महादेव निंबाळकर आणि पथकानं तातडीनं सीसीटीव्ही चित्रणाची तपासणी केली. त्यात या दोन चिनी नागरिकांच्या हालचाली संशयास्पद आढळल्या. रासम यांनी ही बाब उपायुक्त राठोड यांना कळवली. राठोड यांनी विशेष शाखेसह विमानतळावरील ‘सीआयएसएफ’च्या वरिष्ठांना संशयित चिनी नागरिकांबद्दल माहिती कळवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *