आदेश बांदेकरांच्या सिद्धिविनायक ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवडीला निलेश राणेंचा विरोध

प्रसिद्ध अभिनेते आणि शिवसेना नेते आदेश बांदेकर यांची प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बांदेकर यांनी मंगळवारी हा पदभार स्वीकारला. यावेळी अन्य पदाधिकारी तसेच संपूर्ण बांदेकर कुटुंबियही यावेळी उपस्थित होते.

बांदेकर यांचे नाव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदासाठी सुचवले होते. त्यानंतर राज्य सरकारने या संदर्भात सोमवारी अधिसूचनेद्वारे घोषणा केली. अध्यक्ष म्हणून भाविकांची सेवा हाच भाव या सूत्राने काम करणार असल्याचे बांदेकर यांनी सांगितले.
बांदेकर यांच्याकडे २४ जुलैपासून पुढील तीन वर्षे विश्वस्त मंडळाचे अध्यक्षपद राहील. बांदेकर यांच्या निवडीची चर्चा रविवार संध्याकाळापासून सुरू झाली होती. मात्र त्याची औपचारिक घोषणा सोमवारी करण्यात आली.

दरम्यान, काँग्रेस नेते निलेश राणे यांनी आदेश बांदेकर यांची सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष पद तात्काळ रद्द करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. आदेश बांदेकर यांना याआधी कोणत्याही प्रकारचा शासकीय कार्याचा अनुभव नाही. तसेच या निवडीमुळे एका विशिष्ट राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या पक्षाला याचा जास्तीत जास्त लाभ होईल असे निलेश राणे यांनी पत्रात म्हटले आहे. याशिवाय, बांदेकर हे आधीपासूनच एका पक्षाचे सचिव आहेत. त्यामुळे त्यांना या पदावरुन हटवण्यात येण्याची मागणी करणारे पत्रक निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *