अंधेरी पूर्वेकडील सेव्हन हिल रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरून राममुरत जयस्वाल (५७) या रुग्णाने उडी घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. आजारपणाला कंटाळून त्याने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रिक्षाचालक असलेले जयस्वाल जोगेश्वरीत पत्नी आणि तीन मुलांसह राहत होते. गेल्या तीन ते चार वर्षांपासून त्यांना हृदयविकाराचा त्रास होता. त्यामुळे त्यांना सतत औषधं घ्यावी लागत होती. जयस्वाल यांना १४ जुलैला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ‘राजीव गांधी जीवनदायी योजने’अंतर्गत १९ जुलैला त्यांची बायपास करण्यात आली. शस्त्रक्रिया मोठी असल्याने त्यांना आणखी चार दिवस रुग्णालयात राहावे लागेल, असे त्यांना डॉक्टरांनी सांगितले. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास त्यांचा लहान मुलगा प्रवेश हा त्यांच्याजवळ होता. तेव्हा ‘मला रुग्णालयात नाही राहायचे, घरी जायचेय’ असे जयस्वाल यांनी सांगितले. तुम्हाला डिस्चार्ज मिळणार आहे, हे सांगण्यापूर्वीच त्यांनी मुलासमोरच गॅलरी ओडिटोरियम आणि कॅन्टीन परिसरात दाखल होत आठव्या मजल्यावरून उडी मारली.
त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश बहिरवडे यांनी सांगितले. त्यांना दारूचे व्यसन होते. मात्र रुग्णालयात ते त्यांना शक्य नव्हते. त्यामुळेदेखील ते त्रासले होते, असेही पोलिसांनी सांगितले.
