राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या वडिलांनी एका शाळेत जाऊन तिथल्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर दिसतोय. याप्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय. पण पाच दिवस उलटले तरी पोलिसांनी काहीच कारवाई केलेली नाही.
घुंगशी हे गृह राज्यमंत्री रणजीत पाटील यांचं मूळ गाव… त्या गावात त्यांचे वडील आणि माजी आमदार विठ्ठल पाटील यांचं कॉलेज आहे. तसंच त्यांचे विरोधक ‘विज्युक्टा’ संघटनेचे पदाधिकारी प्रा. संजय देशमुख यांचीही शिक्षण संस्था आहे. या दोन्ही संस्थांमध्ये २०१० पासून न्यायालयीन वाद सुरू आहेत. गेल्या १ जुलैला या वादाचा पुन्हा एकदा भडका उडाला.
गृह राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या वडिलांनी भाऊसाहेब देशमुख महाविद्यालयात जाऊन तपासणी करायला सुरूवात केली. त्यांच्यासोबत माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. विठ्ठल पाटील शाळेची तपासणी करत असताना प्राचार्य संजय देशमुख यांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ शुटिंग घ्यायला सुरूवात केली. त्यावरून दोघांमध्ये वादावादी झाली.
