मेट्रोवरही रुपयात वैद्यकीय सेवा

महिनाभरात स्थानकांवर चिकित्सालये सुरू होणार

मुंबईतील सात रेल्वे स्थानकांवर यशस्वीपणे १ रुपयात वैद्यकीय सेवा दिल्यानंतर आता मेट्रो स्थानकांवरही ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. मेट्रो स्थानकावर चिकित्सालये सुरू करण्याबाबत मेट्रोच्या व्यवस्थापकांनी ‘मॅजिकदिल’ या संस्थेला विचारणा केली होती. या संस्थेने चिकित्सालये सुरू करण्याची तयारी दर्शविली असून येत्या महिनाभरात मेट्रो स्थानकावरही ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

दीड महिन्यांपूर्वी घाटकोपर स्थानकाशेजारी १ रुपयात वैद्यकीय सेवा देणारे चिकित्सालय सुरू करण्यात आले होते. यानंतर दादर, कुर्ला, मुलुंड, वडाळा रोड, ठाणे व मानखुर्द या रेल्वे स्थानकावर ही चिकित्सालये व शेजारीच औषधांची दुकाने सुरू झाली. वैद्यकीय तपासणीसाठी येथे रुग्णांकडून केवळ १ रुपये आकारले जात असून रक्त तपासणी, सिटी स्कॅन, एमआरआय या तपासण्या सवलतीच्या दरात केल्या जातात.

ही सवलत आता मेट्रोच्या प्रवाशांनाही उपलब्ध होणार आहे. बुधवारी मुंबई मेट्रोच्या (रिलाईन्स कंपनी) व्यवस्थापकांनी मेट्रो स्थानकावर १ रुपयात वैद्यकीय सेवा देणारे चिकित्सालय सुरू करण्याबाबत  ‘मॅजिकदिल’ या संस्थेकडे विचारणा केली होती.

याबाबत संस्थेचे प्रमुख डॉ. राहुल घुले यांनी तात्काळ हा प्रस्ताव मान्य केला. मेट्रोच्या अंधेरी, डी.एन.नगर, साकीनाका, मरोळ नाका व घाटकोपर या स्थानकांवर चिकित्सालये व औषधांची दुकाने सुरू करण्याचा ठराव झाला असून येत्या महिनाभरात ही नवीन सेवा मेट्रोतून प्रवास करणाऱ्या ५ लाख नागरिकांसाठी खुली असणार आहे.

दीड महिन्यांत १२,००० जणांची तपासणी

गेल्या ४५ दिवसांत रेल्वे स्थानकावरील चिकित्सालयात १२ हजार ५५५ नागरिकांनी वैद्यकीय तपासणी केली. दादरमध्ये ३३७५ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून तर घाटकोपरमध्ये ३८९७, कुर्ला ३२००, वडाळा रोड १२०० व मुलुंड येथे ९८० रुग्णांची वैद्यकीय तपासणी केली आहे. यातील अधिकतर रुग्ण मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईड या आजारांनी त्रस्त आहेत. या चिकित्सालयांमध्ये दररोज ५० ते ६० रुग्णांची रक्त तपासणी केली जाते, असे डॉ. घुले यांनी सांगितले.

रेल्वे स्थानकावरील १ रुपयात सेवा देणाऱ्या चिकित्सालयांचा मात्र सर्वसामान्य नागरिक चांगला प्रतिसाद देत आहेत. या चिकित्सालयात केलेल्या तपासणीचा अहवाल चिकित्सालये असलेल्या स्थानकावर किंवा ईमेलवर उपलब्ध असल्याने नोकरदार वर्गाच्या वेळेची बचत होते.

डॉ. राहुल घुले मॅजिकदिलप्रमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *