योग हा खेळाचा प्रकार नसल्याचं जे लोक मानतात, ते अज्ञानी आहेत. अशा लोकांच्या विचारांनाही मानू नये, असं बाबा रामदेव म्हणाले. ऑलिम्पिक स्पर्धेत योगाचा समावेश करण्याबाबत प्रयत्न केले पाहिजेत, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. योगी आदित्यनाथ यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी निवड करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही त्यांनी कौतुक केले. केवळ पंतप्रधान मोदीच योगींना मुख्यमंत्री करू शकतात, असं ते म्हणाले. एनडीएकडून रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्याच्या निर्णयावरही त्यांनी भाष्य केले. कोविंद यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार घोषित करण्याचा निर्णय हा भाजपचा मास्टरस्ट्रोक आहे, असं ते म्हणाले. कोविंद यांच्या उमेदवारीला विरोधी पक्षनेते विरोध करत असल्याचं बोललं जात आहे. त्यांनाही बाबा रामदेव यांनी टोला लगावला आहे. भाजपनं दलित कार्ड खेळल्याचे विरोधी पक्षनेते बोलत आहेत, यावरून ते किती संकुचित विचारांचे आहेत हे दिसून येते, अशी टीकाही त्यांनी केली.
