वेतन थकल्यामुळे २२ जूनच्या मध्यरात्रीपासून संपावर जाण्याचा इशारा बेस्ट कर्मचाऱ्यांनी दिला आहे. बेस्ट चालक आणि वाहकांचे वेतन देण्यात न आल्याने बेस्ट वर्कर्स युनियनने आक्रमक भूमिका घेतली आहे. मे महिन्याचे निम्मेच वेतन देण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे २३ जूनपासून मुंबईकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
‘कामगार न्यायालयाच्या निर्देशांनुसार महिन्याच्या २० तारखेपर्यंत वेतन मिळायला हवे. मात्र बेस्ट प्रशासनाने त्या दिवशी केवळ ५० टक्के वेतन देण्याचा निर्णय घेतला. प्रशासनाचा हा निर्णय चीड आणणारा आहे. शैक्षणिक वर्ष सुरु होत असल्याने कर्मचाऱ्यांना मुलांच्या शाळेचे शुल्क भरायचे आहे. यासोबतच पुस्तके, गणवेश, रेनकोट यांच्या खरेदीसाठीदेखील कर्मचाऱ्यांना वेतनाची आवश्यकता आहे. त्यामुळे २२ जुनपर्यंत पूर्ण वेतन न मिळाल्यास कर्मचारी मध्यरात्रीपासून काम थांबवतील,’ असा इशारा बेस्ट वर्कर्स युनियनचे नेते शशांक राव यांनी दिला.
