भारतीय बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून पसार झालेला विजय माल्ल्याने चॅम्पिअन्स ट्रॉफीमधील भारत – पाकिस्तान सामन्याला उपस्थिती लावली आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. रविवारी बर्मिंगहॅममध्ये भारत – पाकिस्तानदरम्यान पार पडलेल्या हायव्होल्टेज सामन्यात विजय माल्ल्या बिनधास्तपणे व्हीआयपी सेक्शनमध्ये बसून भारतीय संघासाठी चिअर करत होता. त्यानंतर भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांच्यासोबतही विजय माल्ल्या चर्चा करताना दिसला. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या माल्ल्याने यानंतर ट्विटरवरुन आपलं म्हणणं मांडलं. ‘भारत – पाकिस्तान सामन्यासाठी माझ्या उपस्थितीला मीडियाने खूप कव्हरेज दिला. भारतीय संघाला चिअर करण्यासाठी सगळ्या सामन्यांना उपस्थित राहण्याची माझी इच्छा आहे’, असं सांगत माल्ल्याने आपण बिनधास्तपणे स्टेडिअममध्ये येऊन सामने पाहणार असल्याचं सांगत एकाप्रकारे आव्हानच देऊन टाकलं आहे.
यावेळी माल्ल्याने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचं कौतुकही केलं आहे. एकेकाळी विराट कोहली विजय माल्ल्यांची मालकी असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातून खेळत होता. ‘वर्ल्ड क्लास प्लेअर, वर्ल्ड क्लास कॅप्टन आणि वर्ल्ड क्लास जेंटलमन’, अशा शब्दांत माल्ल्याने विराटचं कौतुक केलं आहे.
