भारतानं सर्जिकल स्ट्राईक केलं की नाही यावरुन राजकारण सुरु झाल्यानंतर भारतीय सैन्याने या कारवाईचे पुरावे केंद्र सरकारकडे सुपूर्द केले आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार सर्जिकल स्ट्राईकचा 90 मिनिटांचा व्हिडीओ सैन्याने सरकारला सोपवला आहे. तसंच, गरज पडल्यास ते पुरावे सार्वजनिक करायलाही लष्करानं ग्रीन सिग्नल दिला आहे.
दिल्लीत आज केंद्रीय कॅबिनेटची बैठक आहे. त्याअगोदर सीसीए म्हणजेच कॅबिनेट कमिटी ऑन सेक्युरीटीची बैठक होते आहे. त्यात हे फुटेज पाहिलं जाईल असं वृत्त आहे. पण लोकांनी लष्करावर विश्वास ठेवावा, असं आवाहन लष्करानं केला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालंसह काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम पुरावे मागत होते. त्यानंतर आता सैन्याने हा व्हिडीओ सरकारकडे सोपवला आहे.
मात्र हा व्हिडीओ जारी करण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही. हल्ल्याचं रेकॉर्डिंग करण्याचा उद्देश राजकीय नाही तर रणनीतीसाठी होता.
दरम्यान, पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही, असा दावा करणाऱ्या पाकिस्तानला प्रत्यक्षदर्शींनी तोंडघशी पाडलं आहे. 29 सप्टेंबरच्या पहाटे भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांच्या तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात खात्मा केलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह ट्रकमधून अज्ञातस्थळी नेऊन दफन केलं, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
