देशातील नामवंत कंपन्यांच्या ब्रेडमध्ये कर्करोग होण्याचा धोका असलेले रासायनिक द्रव्य पोटॅशियम ब्रोमेटवर लवकरच बंदी येणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.
सेंटर फॉर सायन्स अँड इनॉव्हमेंट (सीएसई) या संस्थेला ३८ पाव व बन्समध्ये ८४ टक्के पोटॅशियम ब्रोमेट व पोटॅशियम आयोडाईट आढळले. सार्वजनिक आरोग्याला धोकादायक म्हणून जगातील अनेक देशांमध्ये या रसायनांवर बंदी आहे. मात्र, भारतात त्यावर बंदी नाही, असे संस्थेने सांगितले.
नड्डा म्हणाले की, अन्न सुरक्षा आणि दर्जा प्राधिकरण संस्थेला हे प्रकरण गांभीर्याने घेण्याचे आदेश दिले आहेत. या संस्थेच्या आदेशानंतर आवश्यक ती कडक कारवाई केली जाईल.
अन्न व्यवसायात ११ हजार पदार्थ पुरक वापरले जातात. त्यात पोटॅशियम ब्रोमेटचा समावेश आहे. आता काळजीपूर्वक चाचणीनंतर अन्न सुरक्षा आणि दर्जा प्राधिकरण संस्थेने पोटॅशियम ब्रोमेटचा समावेश रद्द केला आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवन कुमार अग्रवाल यांनी दिली.
आम्ही केंद्रीय आरोग्य खात्याला आमची शिफारस पाठवली आहे. याबाबतची अधिसूचना काढण्यास आणखी आठवडा लागू शकतो. सरकारने पोटॅशियम ब्रोमेटला पुरक पदार्थाच्या यादीतून काढल्यास ते वापरण्यास बंदी येईल. तसेच पोटॅशियम आयोडाईटच्या पुराव्यांची तपासणी सुरू असून त्याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल, असे ते म्हणाले.