पोलिसांनी एका चोरीचा छडा मोठ्या खुबीने लावला आहे. हातावर गोंदलेल्या टॅटूच्या मदतीने आरोपींना पकडले आहे. पोलीस एवढ्यावरच न थांबता चोरी झालेला मुद्देमालही जप्त करण्यात यशस्वी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून काही मोबाईल आणि एक दुचाकी जप्त केली आहे.
२६ जानेवारी रोजी नालासोपारा पूर्वेच्या वर्तक नगर टॉवरमध्ये राहणाऱ्या निहाल रोहिला यांच्या राहत्या घराचा कडी कोयंडा उचकटून दोन चोरट्यांनी घरातला ऐवज चोरी करून नेला होता. यावेळी हे चोरटे घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. मात्र तोंडावर मास्क लावले असल्याने व सीसीटीव्ही फुटेज स्पष्ट नसल्याने चोरट्यांची ओळख पटवणे पोलिसांसमोर आव्हान होते.
मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोराच्या हातावर असलेला त्याच्या नावाच्या टॅटू कैद झाला व त्याआधारे पोलिसांना चोरट्यांपर्यंत पोहोचण्यात यश मिळाले. सिद्धेश चनोरी (21), सुशांत भारंकार (19) अशी या आरोपींची नावे असून तुळींज पोलिसांकडून दोघांना अटक करण्यात आले आहे. त्यांकडून पाच मोबाईल, रिस्ट वॉचेस आणि दुचाकी असा एकूण 63000 किमतीचा मुददेमाल हस्तगत केला आहे, अशी माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पालांडे यांनी दिली.