मीरा रोडमध्ये इमारतीला तडे, कुटुंबांना हलवले संक्रमण शिबिरात

मीरा रोड येथील जीसीसी क्लब जवळच्या ग्रीन वूड कॉम्पलेक्स या इमारतीला तडे गेले आहेत. मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली. खबरदारीचा उपाय म्हणून तडे गेलेल्या इमारतीला लागून असलेल्या अन्य चार इमारती रिकामी करण्यात आल्या आहेत. या कॉम्पलेक्समध्ये एकूण ९५ कुटुंबे राहतात.अमिताभ, अमन, माधुरी आणि शाहरुख अशा चार इमारती येथे आहेत. इमारतीला तडे गेल्याची माहिती मिळताच अग्निशन दल आणि बचाव पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. इमारतीला तडे गेले असले तरी त्यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही.

इमारत राहाण्यासाठी धोकादायक असल्याने प्रशासनाने तात्काळ संपूर्ण इमारत रिकामी करण्याचा निर्णय घेतला. अचानक ओढवलेल्या या संकटामुळे अनेक कुटुंबांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून लोक रातोरात बेघर झाले आहेत. प्रशासनाने या कुटुंबांची तात्पुरती संक्रमण शिबिरात व्यवस्था केली आहे.

मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि भिवंडी या पट्टयात दरवर्षी पावसाळयात इमारती कोसळण्याच्या दुर्घटना घडत असतात. निकृष्ट दर्जाचे बांधकाम, जर्जर झालेल्या इमारती त्यामुळे दरवर्षी पावसाळयात इमारत कोसळण्याच्या दुर्घटना घडून अनेक निष्पाप लोकांना आपल्या प्राणाला मुकावे लागते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *