बोरिवलीतही शालेयविद्यार्थ्यांना ड्रगविक्री

सातवी-आठवी इयत्तेतील मुलांना अंमली पदार्थ विकणाऱ्या तिघांना सोमवारी एका रुग्णवाहिकेच्या चालकाने सोमवारी पकडून पोलिसांच्या हवाली केले. बोरिवलीच्या एमएचबी कॉलनी  पोलिसांनी या तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
खासगी रुग्णवाहिका चालविणारा मोहसीन खान सोमवारी एमएचबी कॉलनी परिसरातून जात असताना, एका रिक्षामध्ये काही मुले अंमली पदार्थाचे व्यसन करीत असल्याचे त्याने पाहिले. यामध्ये येथील एका शाळेचे विद्यार्थी होते. मोहसीन याने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली. नियंत्रण कक्षाने एमएचबी कॉलनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलिस पोहोचताच, विद्यार्थ्यांनी पळ काढला. मात्र अंमली पदार्थ विकणाऱ्या तिघांना मोहसीन व इतर जागरूक नागरिकांनी पकडले. अटक करण्यात आलेले तिघेही दहिसर येथील गणपत पाटील नगरमध्ये राहणारे आहेत. त्यांनी हे अंमली पदार्थ कुठून आणले, याची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. भांडुपपाठोपाठ बोरिवलीतही अंमली पदार्थांची खुलेआम विक्री होऊ लागल्याने चिंता वाढू लागली आहे. शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढत जात आहे, याची जाणीव अजूनही समाजाला प्रकर्षाने झालेली नाही. मुंबई व मोठ्या शहरांत अंमली पदार्थ सहजरित्या आणि स्वस्तात उपलब्ध होतात. हे व्यसन लागल्यानंतर इतर मुलांनाही त्यात ओढण्यासाठी काही मुलांना लक्ष्य केले जाते. ही एक छुपी साखळी आहे. अशा प्रकारे ड्रग्जच्या जाळ्यात अडकलेली अनेक मुले वैद्यकीय उपचारांसाठी डॉक्टरांकडे येण्याचे प्रमाण वाढले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *