राज्याच्या प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी मनीषा आणि मिलिंद म्हैसकर यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद परतला आहे. सरोगसीच्या माध्यमातून मनीषा आणि मिलिंद म्हैसकर यांच्या घरात जुळया मुलींचा जन्म झाला आहे. वर्षभरापूर्वी मनीषा आणि मिलिंद म्हैसकर यांचा एकुलता एक मुलगा मन्मथने आत्महत्या केल्याने त्यांच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली होती.
सध्या या मुली रुग्णालयात असून शुक्रवारपर्यंत त्यांना घरी घेऊन जाता येईल. मुलींच्या जन्माने आमच्या आयुष्यात चमत्कार झाला आहे असे मनीषा यांनी सांगितले. ऑगस्टच्या पहिल्या आठवडयात मुंबईतील रुग्णालयात सरोगेट मातेच्यापोटी या जुळया मुलींचा जन्म झाला. डॉ. जतीन शहा या आयव्हीएफ तज्ञाची यासाठी मदत घेण्यात आली. म्हैसकर दांम्पत्याकडून यापेक्षा जास्त काही तपशील उपलब्ध होऊ शकलेला नाही.
मिलिंद आणि मनीषा म्हैसकर दोघेही राज्याच्या प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी आहे. मिलिंद (५०) हे म्हाडाचे सीईओ आहेत तर मनीषा या शहर विकास विभाग-२ च्या प्रधानसचिव आहेत. मागच्यावर्षी जुलै महिन्यात या दांम्पत्याचा एकुलता एक मुलगा मन्मथने आत्महत्या करुन जीवन संपवले. मुलाच्या मृत्यूनंतर मिलिंद म्हैसकर यांनी एका वर्तमानपत्रात लेख लिहून मुलासोबतचे नातेही उलगडले होते.
