उत्तर प्रदेशमध्ये एका व्यक्तीने अवैध संबंधाच्या संशयावरून पत्नीचे नाकच कापून टाकल्याची घटना घडली आहे. परपुरूषाशी पत्नीचे अवैध संबंध असल्याचा संशय पतीला होता. त्यामुळे रागाच्या भरात पतीने हे कृत्य केले. यात पत्नीच्या नाकाला गंभीर दुखापत झाली. नातेवाईकांनी त्वरीत पीडितेला जिल्हा रूग्णालयात दाखल केले. पीडित महिलेवर उपचार सुरू असून पोलिसांनी संशयित आरोपी पतीला अटक केली आहे.
उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूर येथील पल्होडा गावातील ही घटना असून पतीचे नाव अर्जुन आहे. अर्जुनने पत्नीवर हल्ला केला होता. पोलीस अधीक्षक दिनेश त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुनची पत्नी पाच दिवस त्याला न सांगता बरेलीला गेली होती. त्यावरून अर्जुनने पत्नीशी वाद घातला आणि परपुरूषाशी संबंध असल्याचा आरोप केला. त्याचदिवशी हे प्रकरण पोलिसांत गेले होते. परंतु, पोलिसांनी तडजोडीने हे प्रकरण संपवले होते.
माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, पीडित महिला मुळची बिहारची असून १४ वर्षांपूर्वी तिचा अर्जुनशी विवाह झाला होता. दोघांना तीन अपत्ये आहेत. अर्जुनने पत्नीला एका अनोळखी व्यक्तीच्या दुचाकीवर बसलेले पाहिले होते. त्यानंतर रागाच्या भरात अर्जुनने पत्नीचे नाक कापले. त्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला होता.
