गेल्या दोन आठवड्यांपासून ती आपल्या मृत पिल्लाला पाठीवर घेऊन फिरत होती. कधीतरी हे पिल्लू जिवंत होईल इतकी भाबडी आशा तिला होती. अखेर सतरा दिवासांनंतर तिनं आशा सोडली अन् या पिल्लाला आपल्यापासून कायमचं दूर केलं.
J-35 या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या किलर व्हेलनं २४ जुलैला पिल्लाला जन्म दिला. तब्बल दीड वर्षांनी हे पिल्लू जन्मला आलं. याआधी J-35 ची दोन पिल्लं दगावली होती. त्यामुळे हे पिल्लू वाचेल अशी सगळ्यांना आशा होती. मात्र पिल्लू जन्मला आल्यानंतर काही तासांत ते दगावलं. पिल्लू दगावल्याचा धक्का या व्हेलला इतका होता की तिनं मृत्यूनंतरही या पिल्लाला स्वत:पासून दूर केले नव्हते. ती तब्बल १७ दिवस या पिल्लाला आपल्या पाठीवर घेऊन प्रवास करत होती.
तिनं या पिल्लाला घेऊन जवळपास दीड हजार किलोमीटरचा प्रवास केला. व्हेल दीर्घकाळ पाण्यात राहू शकत नाही. श्वास घेण्यासाठी ती ठराविक अवधीनं पाण्याच्या पृष्ठभागावर येते. त्यामुळे पिल्लाला घेऊन पुन्हा पाण्याच्या पृष्ठभावर येण्यासाठी तिची सर्वाधिक उर्जा खर्च पडत होती. हे आणखी काही दिवस चालू राहिलं तर तिचाही मृत्यू होईल अशी भीती जाणकारांनी व्यक्त केली होती.
अखेरच १७ दिवसांनंतर तिनं आपल्या पिल्लाला अखेरचा निरोप दिला. किलर व्हेल या संवेदनशील म्हणून ओळखल्या जातात. त्या आपल्या मृत पिल्लाला खूप दिवस स्वत: जवळ ठेवतात. मात्र J-35 नं सर्वाधिक काळ आपल्या पिल्लाला जवळ ठेवलं.
