आ. विनायक मेटे यांचा आवाज काढून पोलीस निरीक्षकाकडून ६ लाख रुपये उकळले

शिवसंग्राम संघटनेचे नेते आमदार विनायक मेटे यांचा मोबाइलवर हुबेहूब आवाज काढून पोलीस निरीक्षकासह इतर दोघांकडून ६ लाख २० हजार रुपये उकळणारा, याच संघटनेचा शेवगाव (जि. नगर) तालुकाध्यक्ष नवनाथ हरिश्चंद्र इसरवाडे (रा. गदेवाडी, शेवगाव) याच्यासह आणखी एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात स्वत: गोविंद भगवान ओमासे यांनीच फिर्याद दिली आहे. ओमासे हे शेवगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी आहेत. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीतील ही घटना आहे. ओमासे यांच्यासह शेवगावमधीलच एक वकील व एक माजी नगरसेवकाचीही अशाच प्रकारे फसवणूक झाली आहे. ओमासे यांनीच या दोघांकडून पैसे घेऊन ते नवनाथ इसरवाडे याला दिले आहेत. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मगर करत आहेत.

नवनाथ इसरवाडे हा मेटे यांनी स्थापन केलेल्या शिवसंग्राम या संघटनेचा शेवगाव तालुकाध्यक्ष आहे. त्याने पोलीस निरीक्षक ओमासे यांच्याशी संपर्क करून आपण शिवसंग्राम संघटनेचा तालुकाध्यक्ष असल्याचे सांगत ओळख वाढवली, विश्वास संपादन केला. नंतर त्यानेच ओमासे यांना मेटे यांचा ९४२३२४९१९१ असा मोबाइल क्रमांक असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात तो त्याचा स्वत:चाच होता. त्याच क्रमांकाच्या मोबाइलवरून इसरवाडे याने मेटे यांचा आवाज काढून व मी आ. मेटे बोलत आहे, असे सांगून वेगवेगळ्या कारणांसाठी ओमासे यांच्याकडे पैशाची मागणी केली. अनेकदा पोलीस ठाण्यातच ही मागणी केली.

ओमासे व इतर दोघांनी मिळून गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत इसरवाडे याला एकूण ६ लाख २० हजार रुपये दिले. नंतर ओमासे यांना आपली स्वत:ची फसवणूक झाल्याचे लक्षात आले, त्यानंतर त्यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलीस निरीक्षकाची कृती संशयाच्या भोवऱ्यात

तपासी अधिकारी मगर यांच्याशी संपर्क केला असता नवनाथ इसरवाडे याने पोलीस निरीक्षक ओमासे व इतर दोघांना आ. मेटे यांचा कार्यक्रम आहे, त्यांची जमीन नांगरायची आहे, असे सांगून रक्कम उकळली अशी माहिती दिली. इसरवाडे याने फसवणूक केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र पोलीस निरीक्षक असलेल्या ओमासे व इतर दोघांनी इसरवाडे याला रक्कम का दिली, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक ओमासे यांची कृतीही संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *